मी लंडनच्या ट्यूब ट्रेनमध्ये होतो. माझ्या जखमेतून रक्त वहात होतं. जखम किती मोठी होती? किती खोल होती? काहीच कल्पना नव्हती. नंतर पोलिस चौकीत कळलं की ती जखम म्हणजे पात्याने झालेला तो वार १३ से. मी इतका होता.

१९८५ सालचा मे महिना होता. लंडन ट्यूबचं दार बंद होत असताना मी वेगाने प्लॅटफॉर्मवरून गाडीत घुसलो. पण माझा हल्लेखोरही कमी चपळ नव्हता. ट्यूबचं दार बंद होत असताना त्याने माझ्या पाठीवर वार केलाच.

जखम झाली आहे हे जाणवत होतं कारण प्रचंड वेदना होत होती. पण किती गंभीर आहे हे कळत नव्हतं. वय असं होतं की कोणाकडे मदत मागणं कमीपणाचं वाटलं. मग काय, शूरपणाचा आव आणत दुखणं आणि पाठीवरून वाहणाऱ्या रक्ताची जाणीव सहन करत तसाच बसून राहिलो, घरी जाऊन बघू असा सूज्ञ विचार करून.

स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी काही वेळापूर्वी प्लॅटफॉर्मवर काय घडलं त्याची उजळणी करू लागलो. गाडीची वाट बघत प्लॅटफॉर्मवर मी उभा होतो जेव्हा माझा हल्लेखोर माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्याकडे पैशाची मागणी केली. मी नकारार्थी मान हलवली तेव्हा तो आणखी जवळ आला. माझ्या डोळ्यात डोळे घालून त्याने धमकी दिली. त्याच्या अंगातल्या निळ्या जॅकेटच्या खिशाकडे निर्देश करत तो म्हणाला की त्याच्याकडे सुरा आहे.

Blue Jacket

मी त्याच्या जॅकेटच्या खिशाकडे नजर टाकली. खिशात सूरा आहे ह्यावर माझा अजिबात विश्वास बसला नाही. त्याने त्याचे बोट खिशात उभे धरले असणार अशी मला खात्री होती. आणि अगदी असलाच तरी सुरा शक्य नाही, काहीतरी छोटंसं हत्यार असेल.

माझं लाडकं लेदर जॅकेट, त्याच्या आत शाळेचा कोट, स्वेटर, त्याच्या आत गणवेषाचा पांढरा शर्ट आणि बनियन असे कपड्यांचे एकूण पाच थर माझ्या अंगावर होते. त्या एवढ्याशा, खिशात मावेल अशा हत्याराने मला काय इजा होणार असा मी विचार केला.

London Tube

डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला ट्रेन येताना दिसली. क्षणात एक कल्पना सुचली. माझ्या हल्लेखोराला बोलण्यात असंच गुंगवून ठेवायचं, ट्रेन निघेल, तिचे दरवाजे बंद होत असतील त्याक्षणी जोरात पळत जाऊन ट्रेनमध्ये घुसायचं. त्याला काही उमगण्याच्या आधी मी ट्रेनमध्ये सुरक्षित असेन.

माझा केवळ एक अंदाज खरा ठरला की त्याच्याकडे सुरा नव्हता. त्याचं शस्त्र म्हणजे एक रेझर ब्लेड होतं. नीट धरता यावं म्हणून त्याने एका बाजूला त्याला सेलोटेप लावला होता. पण त्या छोट्याशा स्टीलच्या तुकड्याने माझ्या अंगावरचे पाच थर, बाह्यत्वचा (epidermis) आणि अंतःत्वचा (dermis) असे त्वचेचे दोन थर, सहज चिरत मला जखम केली होती.

नंतर पोलिस स्टेशनमध्ये ते ब्लेड बघितलं आणि विस्मयाने बघतच राहिलो. मी नुकताच दाढी करायला लागलो होतो. रेझर ब्लेड काही मला नवीन नव्हतं. पण त्यावेळी मला जाणवलं मी ब्लेड जरी वापरलं होतं तरी खऱ्या अर्थाने ते आत्ता बघत होतो.

वरच्या दिव्याचा प्रकाश त्यावर पडला होता. ब्लेडची धार चमकत होती. दुपारी ह्या ब्लेडने जो पराक्रम केला होता त्याचा लवलेशही नव्हता. मला एवढी जखम करूनही पात्याला काही म्हणजे काही झालं नव्हतं. त्याचा टवका उडला नव्हता, धारेला कुठे बोथटपणा आला नव्हता.

पोलिसांनी मला एक फॉर्म भरायला दिला. ब्लेडवरची नजर काढून, त्याचे विचार बाजूला लोटून मी फॉर्मकडे वळलो. फॉर्मच्या वरच्या कोपऱ्यात असलेल्या स्टेप्लरच्या पिनने माझं लक्ष वेधलं.

तीसुद्धा स्टीलची होती, त्या ब्लेडसारखीच. एवढीशी, नाजूकशी पिन, पण कागदांच्या त्या गठ्ठयाला आरपार भोक पाडून त्यात घुसली होती. फॉर्मचा गठ्ठा हातात घेऊन मी पिनची मागची बाजू तपासली. तिची दोन्ही टोकं व्यवथित दुमडली होती आणि त्यांनी तो गठ्ठा एकत्र धरून ठेवला होता. ‘भारी!!’ मी उद्गारलो.

माझे आई-वडील शेजारी उभे होते. काळजीने माझ्याकडे बघत होते. माझं असं फॉर्मच्या गठ्ठयाकडे निरखून बघणं क्षणाक्षणाला त्यांची काळजी वाढवत होतं. हा असा का बघतोय? फॉर्म भरायचं सोडून फॉर्मकडे का बघता बसलाय? त्याला त्याचं नाव आठवत नाहीये की काय? दुपारी घडलेल्या प्रसंगाने ह्याच्या मनावर काही परिणाम झाला की काय? असे अनेक प्रश्न मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसले.

त्यांची काळजी अगदीच निराधार नव्हती. माझ्या मनावर परिणाम झाला होता हे खरं. तो क्षण म्हणजे एका वेडाची सुरुवात होती. मटेरियल्सने त्या दिवशी मला जी भुरळ घातली ती कायमचीच.

स्टीलपासून ते वेड सुरू झालं. अचानक मला जाणीव झाली की स्टील माझ्या अवतीभवती सगळीकडे आहे. पोलिसाने फॉर्म भरायला पुढे केलेल्या बॉलपेनच्या टोकात, माझ्या बाबांच्या हातातल्या किल्ल्यांमध्ये, नंतर आम्ही ज्यात बसून घरी आलो त्या आमच्या मिनी कारमध्ये.

जेवताना आईने वाढलेल्या गरमागरम सूपचा पहिला घोट घेतला आणि जाणवलं, मला जखम करणारं ब्लेड ज्या मटेरियलने तयार केलं आहे तेच मटेरियल आत्ता माझ्या तोंडात आहे, चमच्याच्या रूपात.

सूपाचा घोट घेऊन मी चमचा तोंडातून बाहेर काढला आणि त्याच्याकडे कुतुहलाने बघायला लागलो. त्या चमकदार चमच्यात माझं प्रतिबिंब दिसत होतं.

हे मटेरियल आहे तरी काय? त्याला काही चव नाही, वास नाही.. आहे काय हा प्रकार?

अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली. जे मटेरियल विविध गोष्टींच्या रूपात आपल्या आयुष्याचा भाग झालं आहे अशा मटेरियलबद्दल काय माहिती आहे आपल्याला?

आपण हे मटेरियल तोंडात घालतो, दाढीचे नको असलेले केस कापायला वापरतो, त्याच्यात बसून प्रवास करतो. हे आपल्या आयुष्याचा हा अविभाज्य अंग आहे. ज्या मटेरियलशिवाय आपल्या आयुष्याची आपण कल्पना करू शकत नाही, अशा ह्या मटेरियलबादल आपल्याला किती माहिती आहे?

कसे बनते हे? कशाचे बनते हे? काहीच नाही.

ब्लेडचे पाते न वाकता चिरत जाते पण त्याच मटेरियलची बनलेली असून स्टेपलरची पिन मात्र वाकते. असे कसे?


Stuff Matters: Exploring the Marvelous Materials That Shape Our Man-Made World
Mark Miodownik

Categories: Blog

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *